
📍 अमळनेर (प्रतिनिधी) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीस अमळनेर येथील सत्र न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा भगवान रामदास शिंपी (वय ६०, रा. ताडेपुरा, पैलाड, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांना सुनावण्यात आली.
📌 मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता फिर्यादी महिला मजुरीचे काम आटोपून घरी आली होती. त्या वेळी ती तिच्या मुलगी रोशनी हिच्याशी मोबाईलवर बोलत होती. याच कारणावरून तिचे पती भगवान शिंपी यांनी तिच्यावर चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ केली आणि “आज तुला मारून टाकतो” अशी धमकी दिली.
⚠️ काही वेळाने आरोपी पुन्हा घरी आला आणि घरासमोर ओट्यावर बसलेल्या पत्नीला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने पॅन्टच्या खिशातून धारदार चाकू काढून तिच्या गळ्यावर वार केला. पत्नीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता झटापटीत आरोपीने तिच्या दोन्ही हातांवरही चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
👥 या घटनेदरम्यान तिचा मुलगा गणेश घरी आला तसेच परिसरातील नागरिक जमा झाल्याने आरोपी तेथून पळून गेला. जखमी महिलेला मुलगा व शेजाऱ्यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
⚖️ या प्रकरणाचा खटला मा. जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात चालला. सरकारी पक्षाकडून अॅड. के. आर. बागुल यांनी प्रभावी युक्तीवाद करत एकूण ६ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात सादर केली.
महत्त्वाच्या साक्षींमध्ये फिर्यादी पत्नी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रवि टेलर, ज्ञानेश्वर संतोष, पंच तसेच अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताडे यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या.
📜 न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (जिवे ठार मारण्याचा प्रयत्न) अंतर्गत आरोपी दोषी ठरवत ७ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच धमकी दिल्याबद्दल आणखी २ वर्षे कारावास व १००० रुपये दंड अशीही शिक्षा ठोठावण्यात आली.
🤝 या खटल्याच्या कामकाजात पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, पीएसआय उदयसिंग सांळुके, पो.कॉ. राहुल रणधीर, प्रमोद पाटील, सतीष भोई व भरत इशी यांनी सहकार्य केले.
