

अमळनेर :
नगरपरिषदेमार्फत १ कोटी रुपयांच्या निधीतून नमो गार्डन उभारण्याच्या विषयावर चर्चा करताना हा नाल्याचा परिसर आहे येथे दुर्गंधी येते अशी अवमानकारक भाषा वापरल्याने परिसरातील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढून ढोल बजाओ आंदोलन केले.
ताडेपुरा तलाव सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याच ठिकणी १ कोटींचे नमो गार्डन उभारावे असे विरोधकांचे म्हणणे होते तर सत्ताधारी यांनी एक विकासाचे काम येथे सुरू आहे दुसरे विकासाचे काम दुसरीकडे करावे अशी सूचना मांडली होती. त्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात वाद झाले होते. त्यातून चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ ताडेपुरा परिसरातील नागरिकानी मोर्चा काढत मुख्याधिकारी याना निवेदन सादर केले. शहराच्या विकासासाठी कोणतीही योजना स्वागतार्हच आहे; मात्र त्यानिमित्ताने शहरातील काही भागांना कमी लेखणे, तेथे नागरिक जाणार नाहीत असे सार्वजनिकपणे
सांगणे आणि ताडेपुरा तलाव परिसराला गटारीचे पाणी साचलेला भाग म्हणून हिणवणे, हा त्या
परिसरातील प्रत्येक नागरिकाचा उघड अपमान आहे.नागरिकांना दुय्यम दर्जाचे ठरविले आहे काय?
ताडे तलावात गटारीचे पाणी साचते, असे जर खरे असेल तर त्याचे शुद्धीकरण व व्यवस्थापन
करणे ही जबाबदारी नगरपरिषदेची नाही काय? एखादा भाग दुर्लक्षित ठेवायचा, सुविधा द्यायच्या नाहीत आणि नंतर त्यालाच अस्वच्छ म्हणून हिणवायचे ही भूमिका लोकशाही
व्यवस्थेला शोभणारी नाही. सत्ताधारी मंडळी आमच्या दुर्लक्षित भागाला कमी लेखत असल्याने त्यांची भूमिकाच भेदभाव
करणारी दिसत आहे अशा आशयाचे निवेदन पालिकेत देण्यात आले.यावेळी ताडेपुरा भागातील शेकडो महिला व नागरिक यांनी ढोल वाजवत पालिकेवर मोर्चा काढला.
ताडेपुरा तलावाचे पाच कोटी रुपयांचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. नमो गार्डन हा स्वतंत्र विषय असून ते कुठे करायचे याबाबत निर्णय झालेला नाही.-गणेश शिंदे , मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर
