रंबल स्ट्रिप निष्फळ ठरली अमळनेरमध्ये दररोज मालिका आज अपघातांचीशेतकरी जखमी 
अमळनेर शहरातील स्टेशन रोडवरील मंगलमुर्ती चौक ते गलवाडे रोड मार्गे शिरपूरकडे जाणारा प्रमुख रस्ता पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोरील हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून, येथे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज सकाळी याच ठिकाणी दुचाकीवरून जाणाऱ्या एका दुधवाला शेतकरी बांधवाचा अपघात झाला. वाहनाला अचानक धडक बसल्याने दुचाकी घसरून तो रस्त्यावर पडला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी संबंधित शेतकरी जखमी झाला असून मंगलमुर्ती चौक हा अमळनेर शहरातील महत्त्वाचा आणि गजबजलेला चौक आहे. सकाळ व संध्याकाळच्या वेळी शिरपूर मार्गे प्रवास करणारी वाहने, शाळकरी मुले, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिक यांची येथे मोठी वर्दळ असते. मात्र या ठिकाणी वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या परिसरात दररोज दिवसा एक ते पाच अपघात घडत आहेत.
काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथे रंबल स्ट्रिप बसवण्यात आल्या होत्या. मात्र त्या अपुऱ्या ठरत असून अपघात रोखण्यात त्या पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वेग कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्यामुळे वाहनचालक बेदरकारपणे वेगाने वाहन चालवत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून येथे तात्काळ स्पीड ब्रेकर बसवणे, वेग मर्यादेचे फलक लावणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
