खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांची विशेष सर्वसाधारण सभा आज शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली होती.
प्रारंभी गणसंख्या पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर नियमानुसार त्याच ठिकाणी एका तासानंतर सभा पुन्हा घेण्यात आली, ज्यामध्ये खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणूक २०२५ चा अधिकृत निकाल घोषित करण्यात आला.
या सभेचे अध्यक्षस्थान मावळते अध्यक्ष श्री. जितेंद्र झाबक यांनी भूषविले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा श्री. जितेंद्र झाबक यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी निवडणूक उपसमितीचे अध्यक्ष पंडित नाना चौधरी, उपसमितीचे सदस्य श्री. मनोहर महाजन, श्री. विवेक भांडारकर, प्रा. डॉ. सुनील गरूड तसेच निवडणूक उपसमितीचे कायदा सल्लागार अॅड. सुशील जैन व के. व्ही. कुलकर्णी यांचाही अध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सभा शांततामय व लोकशाही पद्धतीने पार पडली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, पारदर्शकता व संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
