निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे गांधीपुरा
पोलीस चौकीजवळ खडीने भरलेला डंपर खड्ड्यात कोसळला; मोठा अनर्थ टळला
अमळनेर : शहरातील गांधीपुरा पोलीस चौकी परिसरात रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आज सायंकाळी एक गंभीर अपघात घडला. खडीने भरलेला डंपर अचानक रस्त्यातील खोल खड्ड्यात कोसळल्याची घटना समोर आली असून संबंधित डंपरचा क्रमांक MH-20 CT 5247 असा आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अमळनेर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून विविध भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. या मार्गावरून दररोज वाळू, खडी व मुरूम वाहून नेणारी जड वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. अवजड वाहनांची सततची वर्दळ आणि खराब रस्ते यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सदर दुर्घटना गांधीपुरा पोलीस चौकी तसेच श्री. ए. ए. पाटील प्राथमिक विद्यालयासमोर घडली. हा परिसर कायम वर्दळीचा असून येथून दररोज शाळेचे विद्यार्थी, पालक, नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. सुदैवाने ही घटना सायंकाळच्या वेळी घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही घटना शाळेच्या वेळेत घडली असती तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कामे केली जात असल्यामुळे काही महिन्यांतच रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र चौकशी करावी, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते तयार करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशीही मागणी पुढे आली आहे. अन्यथा भविष्यात अशा प्रकारच्या गंभीर अपघातांना आमंत्रण मिळू शकते, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
