महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार,
स्वाधार संघ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांची माहिती
लैंगिक व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचा उपजिविकेचा प्रश्न
अमळनेर :-
महिलेला तिच्या मर्जीने वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार असून त्यात कुणीही हस्तक्षेप करु शकत नाही. किंवा तिला तिच्या हक्काच्या घरातून कोणी काढू शकत नाही. जर कोणी बळजबरीने वेश्या व्यवसाय चालवण्यास प्रवृत्त करीत असेल तर अशा चुकीला आम्ही स्वतः विरोध करण्यासाठी पुढे येऊ अशी माहिती ऍड ललिता पाटील यांनी लैंगिक कामगार महिलांच्या स्वाधार संघ व आधार संस्थेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली.
राज्यघटनेच्या समान अधिकारानुसार या महिलांना देखील स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. आज समाजात या महिला आहेत म्हणून इतर महिला सुरक्षित दिसून येत आहेत. न्यायालयाने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत मात्र कॅमेरे बंद आहेत ते सुरू झाले पाहिजेत. नुकत्याच लागलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत काही लोक लैंगिक कामगार महिलांना दमबाजी करून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांची मालमत्ता जप्त होईल असे सांगत असल्याने या महिलांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ऍड. ललिता पाटील , ऍड. सलीम खान , आधार संस्थेच्या भारती पाटील , रेणुप्रसाद हजर होते.
ऍड. सलीम खान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत सांगितले की महिलेला वैयक्तिक तिच्या मर्जीने लैंगिक व्यवसाय करता येतो. न्यायालयाने त्यांचे पुनर्वसन करण्याचेही निर्देश दिले मात्र पुनर्वसन होत नाही.
लैंगिक व्यवसाय करणाऱ्या महिलांची आपबिती :-
आम्हालाही लैंगिक व्यवसाय करायची इच्छा नाही. आमच्या परिवारातील सदस्यांनी हा व्यवसाय केला… आम्ही यात उडरनिर्वाहासाठी गुंतलो आम्हाला आमच्या मुलींना शिक्षण देऊन यातून बाहेर पडायचे आहे. मात्र उपजीविका कशी भागवायची हा प्रश्न आहे. आम्ही १८ वर्षाखालील मुली कडून व्यवसाय करून घेतो अशी शंका असेल तर केव्हांही खात्री करण्यासाठी बंदोबस्त करावा.सीसीटीव्ही कॅमेरे लावा दोषी आढळलो तर अवश्य कारवाई करा पण हेतुपुरस्कर त्रास देऊ नका.
सेक्स वर्कर ही तिच्या मर्जीने व्यवसाय चालवू शकते. मात्र कुणी एजंट हा व्यवसाय घर भाड्याने घेऊन चालवत असेल तर तो गुन्हा आहे. आमच्या पिढ्या याठिकाणी दिढशे वर्षापासून स्थायिक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले..

