पिंगळवाडे आश्रमशाळेतील सात वर्षीय विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू!
अमळनेर:
पिंगळवाडे ता. अमळनेर येथील शासकीय आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ता.३० रोजी सायंकाळी घडली
पिंगळवाडे येथील आश्रमशाळेत सायंकाळची हजेरी घेताना पहिलीचा विद्यार्थी पंकज जमादार वळवी ( वय ७ वर्ष) रा.केलीपाणी ता. तळोदा जि. नंदुरबार हा दिसत नसल्याचे लक्षात आल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी सदर मुलगा शाळेच्या बाजूला असलेल्या अतुल शरद पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडल्याचे लक्षात आले. त्याचे प्रेत वर तरंगत असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची खात्री झाली. पोलिसांना कळवून गावकऱ्यांनी खाटेला दोर बांधून विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भरत कोळी याच्या फिर्यादीवरुन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय राहुल बोरकर हे करीत आहेत.

