मृताच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड टाकरखेडा येथील ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर :- जुन्या रुढी परंपरा यांना तिलांजली देऊन पर्यावरण पूरक समतोल राखण्यासाठी ग्रामीण भागात नवीन स्तुत्य उपक्रमाला सुरुवात झाली असून तालुक्यातील टाकरखेडा येथे नागरिकांच्या मृत्युनंतर वृक्ष लागवड करण्याच्या मोहिमेला नुकतीच सुरुवात आली. यामुळे गावात व परिसरात हरित होऊन दिवंगत झालेल्या व्यक्तींची स्मृतीही स्मरणात राहतील. टाकरखेडा येथील जाधव परिवारातील सदस्यांनी या स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली आहे. गं. भा.गुंताबाई छबीलाल पाटील यांच्या दशक्रिया व गंधमुक्तीविधी दरम्यान स्मशान भूमीत वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मृताची अस्थी व राख ही नदीत न टाकता गावातील मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ केलेल्या वृक्ष लागवडीना ही राख टाकायची म्हणजे नदीतील पाणीही दूषित होणार नाही. मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईक यांनी कमीत कमी एक झाड लावावे. यामुळे गावात वृक्ष लागवड मोहिम संकल्पना कायम राबविली जाऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.असा निर्धार टाकरखेडा ग्रामस्थांनी केल्याने गावासह परिसरातील ग्रामस्थांनी कौतुकास्पद उपक्रम राबविला असल्याची चर्चा आहे. याप्रसंगी अमळनेर पंचायत समितीच्या माजी उपसभापती पूनम भटू पाटील, सरपंच रामदास भिल, सेवा निवृत्त रेल्वे गार्ड नंदकिशोर पाटील, किशोर पाटील,दशरथ पाटील, भाऊसाहेब पाटील,अर्जुन पाटील जितेंद्र पाटील,अजबराव जाधव, अशोक जाधव, जगन्नाथ पाटील, भिकन पाटील, आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाने सर्वत्र चर्चा होत असून कौतुक होत आहे.

