अमळनेर विधान सभा निवडणूकसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी साठी कलगीतुरा —
अमळनेर–
राज्यात पुढील महिन्यात येऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणूकीसाठी महायुती कडून जागावाटपाचे सूत्र ठरल्याप्रमाणे महायुतीकडून मदत व पूनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांच्या विधान सभा मतदार संघात मतदारांशी भेटी सुरु आहेत.महाविकास आघाडीत अद्यापही जागावाटप बाबत अजूनही तिढा सुटत नसल्याने राज्यासह अमळनेर विधान सभेसाठी अजूनही उमेदवार कोण? असा प्रश्न पडला असताना आज ता. 21 रोजी दिवसभरातून अमळनेर शहरासह तालुक्यात तिलोत्तमा पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ. अनिल शिंदे यांची नावे पुढे येत असली तरी सायंकाळी
डॉ. अनिल शिंदे यांनी महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितल्याने चर्चेचा मुद्दा ठरला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून वारंवार उमेदवारी बाबत कुठलाच ठोस निर्णय होत नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. काल ता. 20 रोजी कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांना पाठींबाचे पत्रही व्हायरल झाले होते. मात्र आज ता. 21 रोजी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ता. 22 रोजी उमेदवारी निश्चित करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवार बाबत संभ्रम निर्माण झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय होत आहे.
माजी आमदार शिरीष अपक्षच —
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अगोदरच आपली भूमिका ठाम ठेवल्याने आपल्या कामाला गती देत मतदार संघात कार्यकर्त्यांचा मेळावा आणि प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी कुठल्याही पक्षाची उमेदवारी न घेता अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी ठाम ठेवल्याने जोरदार प्रचार सुरु आहे.
आजही महाविकास आघाडीकडून अमळनेर विधान सभेसाठी निश्चित उमेदवार घोषित नसला तरी डॉ. अनिल शिंदे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून उद्या ता. 22 रोजी पक्षाचा ए बी फॉर्म मिळणार असल्याचे सांगितले.
