राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक 24 फेब्रुवारीला विधानभवनावर लक्षवेधी आंदोलन करणार !

राज्यातील सुमारे 28500 ग्रामपंचायत कार्यालयात मागील 14 वर्षापासून कार्यरत असलेले 20,000 ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने विधानभवनावर 24 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात हजारो संगणकपरिचालक उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अमळनेर तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की,ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या संग्राम(संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व आपले सरकार सेवा केंद्र या दोन प्रकल्पात वेगवेगळ्या कंपन्याच्या माध्यमातून मागील 14 वर्षापासून राज्यातील सुमारे 28500 ग्रामपंचायत कार्यालयात 20000 संगणकपरिचालक अतिशय तुटपुंज्या मानधनावर ग्रामीण भागातील सुमारे 7 कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करतात,त्यामुळे संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी असून शासनाने अनेक वेळा लेखी व तोंडी आश्वासन देऊन सुद्धा ही मागणी मान्य केली नाही,उलट संगणकपरिचालकांला सध्या असलेले 10000 रुपये मासिक मानधन प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला करण्याची हमी घेतलेली असताना सुद्धा 6 – 6 महिने मानधन मिळत नाही,त्यामुळे या महागाईच्या काळात संगणकपरिचालकांना त्यांच्यासह कुटुंबाचा गाडा चालवणे अवघड झाले आहे,शासनाने संगणकपरिचालकांच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा यासाठी 1) यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे,2)कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळण्यास वेळ लागत असेल तर सध्या असलेल्या 10000 रुपये मानधनात शासनाच्या निधीतून 7000 रु. वाढ करून संगणकपरिचालकांचे मासिक मानधन 17000 रुपये करणे,3)ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना कायमस्वरूपी जॉब सेक्युरिटी ,कंत्राटी कामगारा प्रमाणे सर्व लाभ व सुविधा देणे 4)मागील 14 वर्षापूर्वी दिलेले संगणक व इत्तर साहित्य खराब झाल्याने संगणकपरिचालकांना ऑनलाईन कामकाज करण्यास अडथळा होत असल्याने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने नवीन संगणक,प्रिंटर व इत्तर आवश्यक साहित्य पुरवणे,5)महिलां संगणकपरिचालकांना मानधनासहित प्रसूती रजा देणे,6)सर्व संगणकपरिचालकांना किमान ५० लक्ष रुपयांचा अपघाती व आरोग्य विषयक विमा लागू करणे या मागण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 24 फेब्रुवारी 2026 रोजी विधानभवनावर लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या आश्वासनाकडे व संगणकपरिचालकांच्या मागण्याकडे लक्षवेधण्यात येणार असून या आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक आझाद मैदान,मुंबई येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष तथा अमळनेर तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली आहे.
