
अमळनेर : भूमी सुपोषण या चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या मंदिरात भूमिपुत्र श्री मंगळग्रह देवतेची विश्वातील एकमेव स्वयंभू मूर्ती आहे. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य शैलीतील विश्वातील एकमेव श्री भूमीमातेची मूर्ती आहे. या चळवळीचा शुभारंभ वर्ष प्रतिपदेला अर्थात गुरुवार, दि. 19 मार्च 2016 रोजी होत आहे. त्याचे कारण म्हणजे या दिवशी श्री भूमीमातेचा वाढदिवस असतो. तसेच हिंदू नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा आहे. केंद्रीय कृषिमंत्री ना. श्री. शिवराजसिंहजी चौहान तसेच देशातील अनेक महनीय व्यक्तींच्या साक्षीने व प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.
‘भूमी स्वस्थ राहिली तर समाज स्वस्थ राहील’ या भावनेतून तंत्रज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर मेळ साधत शेती मातीसोबतच समाजाच्या सर्वागीण विकासासाठी अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘भूमी सुपोषण एवं संरक्षण अभियानाचा’ शुभारंभ गुरुवार, दि. 19 मार्च रोजी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. भूमी सुपोषण या चळवळीची एकूणच नितांत आवश्यकता व लोकाभिमुखता लक्षात घेता गुरुवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील अध्यक्षस्थानी होते. जलसंपदामंत्री ना. श्री. गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योगमंत्री ना. श्री. संजयभाऊ सावकारे, आमदार श्री. अमोलजी जावळे यांच्यासह पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनन करणवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, अबकारी, कृषी अधिकारी, अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांसह अन्य महत्त्वपूर्ण विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह मा. श्री. बाळासाहेब चौधरी, भूमी सुपोषण चळवळीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे बैठकीस उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनाही या बैठकीचे रितसर निमंत्रण होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत 19 मार्चच्या कार्यक्रमाचे एकूणच आयोजन- नियोजन यशस्विता याबाबत सखोल चर्चा झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह मा. श्री. बाळासाहेब चौधरी यांनी प्रस्ताविकातून अक्षय कृषी परिवारामार्फत देशभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेच्या तयारी व अवाक्याबाबत माहिती दिली. आशिष चौधरी यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसाठी सहकार्य केले.
अभियान व्यापक चळवळ बनावे ः ना. गुलाबराव पाटील
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की माझा संकल्प भूमी- सुपोषण या अभियानाच्या निमित्ताने शेती, माती आणि जीवन यावर परिवर्तनात्मक संवाद होणार आहे. हे अभियान एक व्यापक चळवळ बनावे. भव्य- दिव्य कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासनासोचतच सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सहभागासाठी जनजागृती करावी, असे आवाहन केले.
शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती सुनिश्चित करा ः मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन
जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी गावागावातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती सुनिश्चित करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या अभियानासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा, सहकार्य आणि नियोजन करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. नजीकच्या काळात जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत आणखी काही बैठका होतील. तिन्ही मंत्री महोदय यात जातीने लक्ष घालून वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
प्रशासनाची भक्कम साथ आवश्यक ः डॉ. गजानन डांगे
भूमी सुपोषण चळवळीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी सांगितले, की रासायनिक शेतीचा मानवी आरोग्यावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. सर्व साधने उपलब्ध असतानाही आपण एका विशिष्ट व्यवस्थेत अडकून पडलो आहोत. हा बदल दूरगामी असूनही त्याकडे गांभीयाने पाहिले जात नाही. ‘जमीन सुपोषित ठेवायची असेल तर शेती पद्धतीत नव्याने विचार करण्याची गरज आहे. भारताच्या भूमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, याच उद्देशाने हे अभियान राबविले जात आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाची भक्कम साथ आवश्यक आहे.
