
जप्त 24 वाहनांचा 18 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात लिलाव
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या तब्बल 24 वाहनांचा लिलाव दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात येणार आहे. संबंधित वाहन मालकांनी वारंवार नोटिसा देऊनही दंडाची रक्कम न भरल्याने, प्रशासनाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये थेट लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.
तालुक्यातील विविध भागांतून अवैधरीत्या वाळू, मुरूम व इतर गौण खनिजांची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. त्यानुसार महसूल विभाग, तहसील प्रशासन व संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाया करत अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान मालवाहू ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर व ट्रॉली अशा एकूण 24 वाहनांना ताब्यात घेण्यात आले होते.
कारवाईनंतर संबंधित वाहन मालकांना दंडात्मक नोटिसा व आदेश बजावण्यात आले. मात्र, दीर्घ कालावधी लोटूनही दंडाची रक्कम भरली न गेल्याने, सदर थकबाकी ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील कलम 176 ते 184 नुसार जमीन महसूलाची थकबाकी समजण्यात आली आहे. त्यामुळे जप्त वाहनांचा लिलाव करून, त्यातून मिळणारी रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचा निर्णय तहसील प्रशासनाने घेतला आहे.
तहसील कार्यालय, अमळनेर यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या वाहन लिलाव उद्घोषणा क्र. जमीन-2/गौणख/वाहन लिलाव/कावि/431/2026 (दि. 02 फेब्रुवारी 2026) नुसार,
दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी तहसील कार्यालय, अमळनेर येथे अधिकृतरित्या लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
या लिलावामध्ये स्वराज, सोनालिका, महिंद्रा, मॅसी फर्ग्युसन व न्यू हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर तसेच ट्रॉली व मालवाहू ऑटो रिक्षांचा समावेश आहे. काही वाहने क्रमांक नसलेली असल्याची माहिती असून, प्रशासनाने वाहनांच्या स्थितीचा विचार करून त्यांच्या किमती निश्चित केल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, ट्रॅक्टरच्या किमती अंदाजे 50 हजार रुपयांपासून ते 3 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत.
अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, शासनाच्या महसुलावरही त्याचा परिणाम होत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही महसूल विभागाने दिला आहे.
लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक नागरिकांनी तहसील कार्यालय, अमळनेर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. लिलाव प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व नियमांनुसार राबविण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील ही कारवाई तालुक्यातील इतर वाहन चालक व व्यावसायिकांसाठी एक कडक संदेश मानली जात असून, नियमांचे पालन न केल्यास मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
