अमळनेर 
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहर यंदाही उत्साह, भक्ती आणि अभिमानाने सज्ज झाले आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध भव्य कार्यक्रम, मिरवणुका तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून तालुक्यासह परिसरातून हजारो शिवप्रेमी या उत्सवात सहभागी होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने अमळनेर नगरपरिषदेला विशेष निवेदन सादर करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त शहर स्वच्छ, सुंदर व प्रकाशमय दिसावे यासाठी नगरपरिषदेकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनात प्रामुख्याने
शहरातील सर्व प्रमुख रस्ते व परिसरांची स्वच्छता
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराची आकर्षक सजावट
संपूर्ण शहरात भव्य विद्युत रोषणाई
सर्व पथदिवे सुरळीत कार्यरत ठेवणे
शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्वच्छता व पॉलिशिंग
या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण झाल्यास शिवजयंती उत्सव अधिक दिमाखात साजरा होईल व अमळनेर शहराचा नावलौकिक वाढेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती समितीचे सदस्य अम सोनार, राकेश शेटे, पंकज भोई, उज्ज्वल पाटील, पारस धाप, अभिषेक सोनार, गोकुळ पाटील, आशिष अंधारे, राहुल अहिरे, शुभम पाटील, मोहित पाटील तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे उपस्थित होते.
शिवभक्तांच्या या मागण्यांकडे नगरपरिषद प्रशासन सकारात्मक दृष्टीकोनातून पाहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
