
क. ब. ची. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव अंतर्गत खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर चिमणपुरी पिंपळे, ता. अमळनेर येथे दि. २४ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता चिमणपुरी येथील श्री गुरुदत्त मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एच. डी. जाधव (प्राचार्य, प्रताप महाविद्यालय, अमळनेर) हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करताना, “विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख कार्यातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा तसेच पर्यावरण संवर्धन, जलसंधारण व स्वच्छतेसारख्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा,” असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. संदिप बी. नेरकर (सिनेट सदस्य, क. ब. ची. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव) यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी ‘NOT ME BUT YOU’ या ब्रीदवाक्याचा अर्थ उलगडून सांगत, स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपून कार्य करावे, असे आवाहन केले.
तसेच प्रा. डॉ. व्ही. एम. रोकडे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, क. ब. ची. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त व सेवाभाव कसा विकसित होतो यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मा. सतिष पाटील (उपसरपंच, चिमणपुरी पिंपळे) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी गावाच्या विकासासाठी स्वयंसेवकांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगून शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
उद्घाटनप्रसंगी अधिकाधिक वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संकल्प सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे घेतला. शिबिराच्या कालावधीत पाणलोट व्यवस्थापन, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, जनजागृती, आरोग्य व सामाजिक विषयांवरील उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वयंसेवक प्रतिनिधींनी केले. हे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांमध्ये समाजभान निर्माण करण्यास तसेच ग्रामीण भागाच्या विकासात सकारात्मक योगदान देण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
