अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर नुकतेच विराजमान झालेले डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांच्यावर पहिल्याच दिवशी मोठे राजकीय व कायदेशीर संकट कोसळले आहे. त्यांच्या अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील जातवैधता प्रमाणपत्रास थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, ही याचिका नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली आहे.
विशेष बाब म्हणजे डॉ. बाविस्कर यांच्या पदग्रहणाच्याच दिवशी ही याचिका दाखल झाल्याने त्यांच्या विजयाच्या आनंदावर ग्रहण लागल्याची चर्चा अमळनेरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदाची शपथ घेत असतानाच त्यांच्या जातवैधतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
🔹 बनावट जातवैधतेचा गंभीर आरोप
याचिकाकर्ते जितेंद्र ठाकूर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत डॉ. बाविस्कर यांनी सादर केलेले मल्हार कोळी (अनुसूचित जमाती) या जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र खोटे व बनावट असल्याचा गंभीर दावा केला आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी निवडणूक लढवून नगराध्यक्षपद मिळवले असून, हा प्रकार म्हणजे शासन, निवडणूक यंत्रणा आणि खऱ्या आदिवासी समाजाची फसवणूक असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.
🔹 चार महिन्यांत पदावरून पायउतार होणार?
“न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे इतके ठोस आहेत की, अवघ्या चार महिन्यांच्या आत डॉ. बाविस्कर यांना नगराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागेल,” असा ठाम विश्वास जितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे येणाऱ्या काळात अमळनेर नगरपरिषदेत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🔹 निवडणूक आरक्षणाचा संदर्भ
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या अमळनेर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गासाठी राखीव होते. या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी दाखल केली होती. मात्र शिवसेना (शिंदे गट) कडून डॉ. परीक्षित बाविस्कर यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडणुकीत विजयी झाले.
🔹 मूळ गावातच जमातीचे अस्तित्व नाही?
ठाकूर यांच्या आरोपानुसार, डॉ. बाविस्कर यांचे मूळ गाव पारोळा तालुक्यातील अंबापिंप्री असून, तेथे मल्हार कोळी समाजाचे एकही कुटुंब अस्तित्वात नाही. इतकेच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातही या जमातीचे वास्तव्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशा परिस्थितीत जात पडताळणी समितीकडून वैधता प्रमाणपत्र कसे मिळाले, याबाबत गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
🔹 घरबसल्या पुरावे, आर्थिक व्यवहारांचा आरोप
याचिकेत असेही नमूद करण्यात आले आहे की, घरबसल्या खोटे दस्तऐवज तयार करून आणि आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून हे जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यात आले. याबाबतची सविस्तर कागदपत्रे व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.
🔹 एमबीबीएस शिक्षणही धोक्यात?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, डॉ. बाविस्कर यांनी एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण देखील याच कथित बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर न्यायालयात हे सिद्ध झाले, तर त्यांच्या शिक्षणासह व्यावसायिक भवितव्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
🔹 ‘जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही’
“हा प्रकार म्हणजे खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय असून, शासन व जनतेची फसवणूक आहे. डॉ. बाविस्कर यांना पदावरून हटवले जाईपर्यंत आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होईपर्यंत मी शांत बसणार नाही,” असा ठाम इशारा जितेंद्र ठाकूर यांनी दिला आहे.
🔹 राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया
या प्रकरणामुळे अमळनेरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नगराध्यक्षपदाच्या वैधतेबाबत निर्माण झालेला हा वाद न्यायालयात कोणत्या वळणावर जातो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
