आजी आजोबांनी केल्या ५२ वर्षांपूर्वीच्या शालेय आठवणी जागृत!
वयाच्या पासष्टीत मित्रांची जमली मैफिल
अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील सु.हि. मुंदडा हायस्कूल मध्ये तब्बल ५२ वर्षांपूर्वीच्या ११वी च्या जुन्या बॅचचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात ता.२ रोजी संपन्न झाला.
जुनी ११ वी मॅट्रिक असलेल्या सर्व म्हाताऱ्या आजी आजोबांनी शोधून आपल्या शालेय जीवनातील मित्र मैत्रिणींना एकत्र केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.मारवड हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.
त्यानंतर दिवंगत शिक्षक व वर्गमित्र यांना श्रद्धांजली अर्पण करणारा ठराव दिलीप गणपत पाटील यांनी मांडला.
प्रास्ताविक पंढरीनाथ आत्माराम सोनवणे यांनी केले.
गुरुजनांचा सत्कार स्मृर्तीचिन्ह व कुबेर लॅम्प देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एम.पाटील , एस.बी.पवार , जे.एस.पाटील, शांताराम बापू ,एस.बी.चौधरी ,एच.इन .मारवडकर , भाऊसाहेब सोनवणे (लिपिक), यांचा सत्कार करण्यात आला.
दिवंगत कै. नथ्थु चौधरी , कै. गुलाबराव पाटील ,व कै.डी. जी.शिसोदे , आदींच्या धर्मपत्नींनी हजेरी लावली होती.त्यानंतर उपस्थित सर्व वर्ग मित्र व मैत्रिणींनी आपला थोडक्यात परिचय दिला. वर्गमित्रांतर्फे राजेंद्र भुतडा, पंढरीनाथ सोनवणे, दिलीप वाणी, अलका चौधरी, मंगला सोनवणे, दिलीप शिसोदे, रमेश गुरव, आदींनी मनोगत व्यक्त केले. जे.एस.पाटील व एस.एस.पाटील यां शिक्षकांनी व कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एम.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अनेक वर्षांनंतर मित्र मैत्रिणी भेटल्यावर एकमेकांबद्दल आपलेपणाने विचारपूस केल्याने आजी आजोबाना नवीन ऊर्जा मिळाली. तत्कालीन शिक्षण पद्धती आजची पद्धत , समाज ,संस्कार यावर देखील मनसोक्त चर्चा करताना सर्वांचे मन भारावून गेले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीपराव जगन्नाथ पाटील यांनी तर जिजाबराव विश्वासराव शिसोदे यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली
सर्व उपस्थितांनी तद्नंतर स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन ग्रुप फोटो काढून सर्वांनी पाणावलेल्या डोळ्यांनी व आज पर्यंत असलेल्या मैत्री कायम ठेवण्याच्या वचनाने निरोप घेतला.
वयाच्या पासष्टीत मित्रांची जमली मैफिल :-
माणुस वयाने म्हातारा होतो पण मित्र सोबतीला असले की, तो मनाने कधी म्हातारा होत नाही. वयाची पासष्टी पूर्ण केलेले मित्र तब्बल ५२ वर्षानंतर भेटत असले तरी आठवणी अजूनही ताज्या होत्या असाच भास त्यांच्यात असल्याने मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा याचा अनुभव येत असल्याचा आभास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

