अश्व प्रेमी नवरदेवाचा लग्नात तीस घोड्यांची हजेरी.!
जितेंद्रच्या लग्नात अश्व वऱ्हाडी!
तीस घोड्यांचा नृत्याने वेधले लक्ष
प्रा. हिरालाल पाटील
अमळनेर
आजकाल कोण काय छंद जोपासले सांगता येत नाही.शिवाय आजच्या युगात वेगवेगळ्या प्रकारचे विवाह सोहळे पार पडताना दिसून येताहेत.अमळनेर तालुक्यातील धानोरा गावी असाच एक आगळा वेगळा विवाह पार पडला.या गावातील जितेंद्र देसराज ठाकरे या युवकाचा लग्नाला एक दोन नव्हे तर,तब्बल तीस ते पस्तीस घोड्यांनी हजेरी लावली.
अश्व प्रेमी असलेल्या नवरदेवाचा लग्नात हजेरी लावल्याने तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. नवरदेवचा घरापासून तर थेट मारुती मंदिराच्या पारापर्यंत एका मागोमाग घोड्यांची नृत्याची वरात अमळनेर तालुक्यातील धानोरा गावात पहावयास मिळाली.लग्न होत असलेला नवरदेव हा नितांत घोडे (अश्व )प्रेमी आहे.आणि याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील व तालुक्याबाहेरील घोडे व त्यांचे यजमान जितेंद्र ठाकरे यांच्या लग्नात दाखल झालेले पहावयास मिळाले.
वर पिता देसराज ठाकरे, काका योगराज ठाकरे हे शेती व्यवसाय व सुरुवातीपासून अश्व(घोडे )प्रेमी आहेत. त्यांची आवड जोपासत नवरदेव जितेंद्र ठाकरे यांनीही ती आवड जोपासल्याने त्यांच्या मित्र परिवाराने लग्नाला येताना घोडे सोबत आणीत आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. यावेळी घोड्यांचे नृत्य पाहण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित झाले होते. जणूकाही सारंगखेडा येथील घोड्यांचा यात्रा महोत्सव याच गावात भरला आहे.असे चित्र निर्माण झाले होते.
आजच्या फॅशनच्या दुनियेत विवाह पद्धतीत मोठा बदल झालेला दिसून येतो. त्यात लग्नात मंत्री, खासदार, आमदार यांना आमंत्रण देऊन प्रतिष्ठा मिळवायचा प्रयत्न केला जातो. मात्र आपलाच छंद आणि आवडच महत्वाची समजणारे जितेंद्र ठाकरे आणि त्यांचे अश्वप्रेमी मित्रांनी या विवाह सोहळ्यात अश्व नृत्याने वेगळी झलक दाखवत जिल्ह्यातील आगळा -वेगळा विवाह सोहळा पार पडला..

