प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनात पिंपळे आश्रम शाळेचे
अमळनेर :-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोज अनुदानित आश्रम शाळा, पिंपळे, तालुका अमळनेर येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनात 17 शासकीय व 34 अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपकरणे सादर केली. उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट तयार करून प्रकल्पातील चार बीटमधून प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन उपकरणांना प्रदर्शनासाठी निवडण्यात आले. या प्रदर्शनात अनुक्रमे 14, 12 आणि 26 उपकरणांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन यावल प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचे महत्त्व पटवून दिले आणि प्रयोगशीलता व नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचे आवाहन केले. प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) दौऱ्यावर घेऊन जाण्याच्या आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिले. समारोप व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान डायट कॉलेजचे प्राचार्य श्री.अनिल झोपे होते. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील नाविन्यपूर्णता, आत्मविश्वास व सर्जनशीलतेबद्दल कौतुक केले. त्यांनी सांगितले की, या प्रदर्शनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन दिले असून त्यांच्या आत्मविश्वासाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा मिळेल. प्रकल्प अधिकारी व शिक्षण विभागाने घेतलेल्या या पुढाकाराचे त्यांनी विशेष अभिनंदन केले व या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त केले.
प्राथमिक गटात प्रथम क्रमांक अनुदानित आश्रम शाळा पिंपळे येथील इयत्ता सहावीचा विद्यार्थी सचिन पावरा व करण गोरे या विद्यार्थ्यांच्या उपकरणाला मिळाला या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक इयत्ता अकरावी सायन्स चे विद्यार्थी दीपक पवारा व अनिल पावरा यांच्या यंत्राला मिळाला ,या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना श्री सचिन पाटील श्री रवींद्र नेरकर श्री गंगासागर वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना स्टेट बँक ऑफ इंडिया, यावल यांच्या वतीने इन्सिनेटर भेट देण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री धर्मेंद्र कुमार सिंग, शाखा व्यस्थापक यावल श्री राधेश्याम मूंगमुळे, शाखा व्यवस्थापक अमळनेर श्री शामकांत ठाकरे, जेष्ठ अधिव्याख्यता डायट जळगाव डॉ. सी. डी. साळुंखे, श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी, पिंपळेच्या अध्यक्षा श्रीमती विद्याताई युवराज पाटील, श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी सचिव श्री युवराज दगाजीराव पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निरीक्षण व मूल्यांकन कार्य विज्ञान शिक्षक
श्री निरंजन पेंढारे श्री डी. के. पाटील, श्री पी. डी.पाटील यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीते आयोजनासाठी सहा. प्रकल्प अधिकारी श्री पवन पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल व अनुदानित आश्रम शाळा, पिंपळे यांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

