आडगाव पोलीस पथकाने थरारक पाठलाग करुन पकडला १५ लाखांचा गांजा
पोलीस पथकात अमळनेरचे सुपुत्र पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांची टीमची उत्तम कामगिरी
अमळनेर :-
आडगाव पोलीस ठाणे हद्दीत ता.०७ रोजी पहाटे ०२:३० वाजताच्या सुमारास नववा मैल येथे लाल रंगाचे वाहन मारुती एस एक्स ४ क्र. एम.एच.०२ जे.पी.०१२३ च्या चालकांनी वाहन न थांबवता स्टॉप अॅण्ड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदारांच्या अंगावर भरधाव सरळ गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस अंमलदार हे बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला.
पो.हवा / १५९ गांगुर्डे भाऊराव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती देवून संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली.यानुसार नियंत्रण कक्षात कर्तव्यास असणाऱ्या आरटीपीसी म.पो.अं/१२९ सुगंधा नवले यांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल देवून मदतीस पाठविले. यावेळी मदतीसाठी आडगाव डीबी मोबाईल, आडगाव पिटर मोबाईल, पर्यवेक्षक-१ कर्तव्यावरील पो.नि / डहाके, चेकींग कर्तव्यावरील पो.नि/पतकी, मुंबई नाका डीबी मोबाईल, भद्रकाली पिटर मोबाईल, पंचवटी डीबी तसेच रात्रगस्त कर्तव्यावरील सपोआ/ नितीन जाधव यांनी मिळून अशा ८ वाहनांनी या संशयीत वाहनाचा चित्तथरारक पाठलाग केला.संशयीत वाहनाचा हा पाठलाग सुमारे २:०० ते ३:०० वाजेपर्यंत सतत सुरु होता. वाहनाचा पाठलाग ९ वा मैल ते द्वारका, द्वारका ते यु टर्न अमृतधाम, अमृतधाम यु टर्न ते के.के. वाघ कॉलेज ते चक्रधर स्वामी मंदीर पर्यंत असा सुमारे २५ किमी सतत सुरु होता. २ ते ३ तास सतत २५ किमी अंतर थरारक पाठलाग केल्यानंतर या संशयीत वाहनास ताब्यात घेण्यास पोलीस दलास यश आले. ते ताब्यात घेण्यापूर्वी आरोपीने पोलीसांच्या ४ वाहनांना धडक देवुन कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे हा पाठलाग रात्रीची वाहतूकीस तसेच लोकवस्ती असणाऱ्या परिसरात करण्यात येत होता. त्या दरम्यान पाठलाग करणाऱ्या पोलीस वाहनांचा प्राथमिकता ही सदर संशयीत वाहनास निर्मनुष्य वस्तीकडे घेवुन जाणे व त्याठिकाणी त्या वाहनास आणि चालकास ताब्यात घेणे ही होती. त्यानुसार सर्व पोलीस वाहनांनी आपआपसात समन्वय ठेवून सदर वाहन निर्मनुष्य वस्तीकडे जाण्यास भाग पाडून कोणत्याही सामान्य नागरीकास तसेच वाहतुकीस अडथळा होऊ न देता यशस्वीरित्या ताब्यात घेतले.यात पाच पैकी चार आरोपी अंधाराचा फायदा घेवुन पळून जाण्यात यशस्वी झाले. १ आरोपी ताब्यात घेण्यास पोलीसांना यश आले. गाडीची झडती घेतली असता वाहनामध्ये २८ किलो गांजा आढळून आला. १ आरोपी अटक व वाहन गांजासह जप्त करण्यात आले आहे. असा १५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीवर त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून भा.न्या.सं. १०९ (१) प्रमाणे तसेच अंमली पदार्थ बाळगल्या बद्दल एन.डी.पी.एस. ८ (क), २० (ब) (ii) (c) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देवून गौरविले आहे.

