१०८ रुग्णवाहिका सेवा कोलमडली
वेळेवर रुग्णवाहीका नसल्याने मातेला गमवावे लागले बाळ, मांडळ येथील घटना
अमळनेर :
मांडळ ता. अमळनेर येथील ज्ञानेश्वर शालीक पारधी यांच्या पत्नी हिराबाई पारधी ह्या सहा महिन्यांची गर्भवती असताना त्यांना दोन तीन दिवसांपूर्वी प्रसूतीपूर्व कळा सुरू झाल्या होत्या. घरी कोणी नसल्याने महिला विव्हळत होती. गावातील महिलांनी व आशा स्वयंसेविका ती परिस्थिती बघून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टरांना बोलवायला गेल्या. मात्र डॉक्टरांनी महिलेच्या घरी येण्यास नकार दिला. आरोग्य केंद्रांसाठी असलेली १०२ रुग्णवाहिका त्याठिकाणी उपलब्ध नव्हती.
गर्भवती महिलेच्या पतीने तिला खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात नेले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करीत धुळ्याला येथे दाखवण्यात आले. दुसऱ्या दिवशी महिला प्रसूत झाली आणि तिचे बाळ मेले. तालुक्यात पुन्हा एकदा प्राथमिक आरोग्य केंद्राची अनास्था समोर आल्याने सर्वत्र तिव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाने आरोग्य सुविधा पुरवताना रुग्णांना ने-आण साठी 108 रुग्णवाहीकाच वेळेवर उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांची शासनाने मोफत आरोग्य सेवा नुसताच बोजवारा असून जाणाऱ्याला तेथे मरणाची भीतीच जास्त येईल असे बोलले जात आहे.
दरम्यान या ठिकाणी मांडळ येथील रुग्णांना शिवीगाळ करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन महिला वैद्यकीय अधिकारींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान चौकशीत महिला डॉक्टरांनी देखील त्यांना शिवीगाळ झाल्याचा आरोप केला मात्र डॉक्टरांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

