27,28, 29 डिसेंबर दरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
खान्देशासह , मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
अमळनेर : –
ता.27,28 29 डिसेंबर दरम्यान खान्देश,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सध्यस्थितीत सर्वत्र रब्बी हंगाम जोरदार असून खरीप हंगामात सततच्या पावसाने शेतकरी बांधवांचा खर्चही निघाला नाही. यावर्षी पावसाळा जास्त प्रमाणात असल्याने विहीरी, कुपनलिका यांना पाणी असल्याने रब्बी हंगामात बागायती क्षेत्र जास्त प्रमाणात दिसून येत आहे. मका, हरभरा, दादर, गहू, यांचा पेरा जास्त प्रमाणात आहेत. मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अंदाज सांगितल्याने यामुळे नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान अशा परिस्थितीत शेतकरी बांधवानी ता.27 डिसेंबर ते 29 डिसेंबर काळजी घ्यावी. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस गारपीट पडण्याची शक्यता देखील आहे.
28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

