पाणी पिण्यासाठी गेलेली बैलगाडी पाण्यात बुडाली
अमळनेर : पाणी पिण्यासाठी पांझरा नदीत बैलांनी बैलगाडीसह धाव घेतली आणि वालखेडा येथील कोल्हापूर बंधाऱ्यात बैलांसह गाडी बुडाल्याची घटना ता.१७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
पांझरा नदीकाठावर कोल्हापूर बंधाऱ्याच्या जवळ शेती असलेल्या भावाच्या शेतात सर्जेराव तुकाराम शिंदे वय ७५ हे बैलगाडी घेऊन शेतात काम करण्यासाठी गेले. काम झाल्यानंतर सायंकाळी घरी परतताना बैलांना पाणी पाजण्यासाठी बैलगाडी जुंपली. पाणी पाहताच बैलांनी पाणी पिण्यासाठी थेट नदीतच धाव घेतली. बैलगाडी थेट बंधाऱ्याकडे निघाली मात्र काठावर खड्डा असल्याने थेट खड्ड्यात पडली. गाडी लोखंडी असल्याने थेट बैलासह गाडी बुडाली. सर्जेराव वृद्ध असल्याने ते बैलांच्या मागे पळू शकले नाही म्हणूनच ते बचावले अन्यथा बैलांसह तेही बुडाले असते. ही बातमी मासे पकडण्याऱ्या व्यक्तींनी गावात कळवली. माहिती मिळताच त्यांचा मुलगा आशिष याने शेतात धाव घेतली. व वडिलांना घेऊन घरी आला.
डोळ्यासमोर बैलजोडी आणि गाडी बुडल्याने हताश होऊन शिंदे बेशुद्ध झाले. एक लाखाची नवी जोडी आणि गाडी ५० हजाराची असे दीड लाखांचे नुकसान झाले. रात्र झाल्याने बैलांचा आणि गाडीचा शोध घेता आला नाही. दरम्यान या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी मारवड पोलिसांना कळविली असून सकाळी बैलगाडी काढण्यासाठी बाभळे येथून मोठी क्रेन मागविली आहे.

