वाहतूक कोंडीमुळे डंपर मोटरसायकल अपघात
अमळनेर बसस्टँड जवळ वाहतुकीची कोंडी
अमळनेर :-
वाहतुकीच्या कोंडीमुळे बसस्थानकाजवळ एका डंपर ने मोटरसायकलस्वाराना फरफटत नेल्याने दोन वृद्ध गंभीर जखमी झाले तर दोन लहान मुले बचावली आहेत. ता.१३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
जनार्दन अर्जुन बारी वय ६० व पुंडलिक बाबुराव बारी वय ६७ हे दोन्ही रा.पानखिडकी येथील चुलत भाऊ मोटरसायकलवरून नातवाना खेळणी घेण्यासाठी जात असताना बसस्थानकाजवळ रिक्षा , टॅक्सी अवैध प्रवासी वाहने यांच्यामुळे कोंडी झालेली होती. डंपर क्रमांक एम एच १८ बी झेड ००७७ च्या चालकाने रस्त्यावर ट्रॅफिक असताना विचार न करता वाहन चालवल्याने मोटरसायकल डंपर मध्ये अडकून दोन्ही वृद्ध व लहान मुले फरफटत नेली जात होती. लोकांनी आरडा ओरड केल्याने डंपर थांबला मात्र चालक फरार झाला.
अपघाताचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या आदेशाने पोलीस मिलिंद सोनार , प्रशांत पाटील , सचिन पाटील , विनोद संदानशीव , विलास बागुल , नितीन कापडणे यांनी भेट दिली. दोन्ही वृद्धांना रिक्षाने ग्रामीण रुग्णालयात पोहचविण्यात आले. तेथून त्यांना नर्मदा फौंडेशनला नेण्यात आले. वाहतुकीची कोंडी सोडवून हर्षल पाटील या पोलिसाने डंपर चालवत पोलीस स्टेशनला जमा केले. एकाला पायाला तर दुसऱ्याला डोक्याला मार लागला होता. सुदैवाने लहान मुलांना काहीच लागले नाही.

