पाडळसरे धरणाच्या पाच शासकीय उपसा सिंचन योजनांच्या कामाला सुरुवात
अमळनेर :-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या पाच शासकीय उपसा सिंचन योजनांच्या कामाला सुरुवात झाल्याने शेतकरी बांधवानी समाधान व्यक्त केले आहे.
आमदार अनिल पाटील यांनी आचारसंहितेपुर्वी सुमारे एक हजार कोटींच्या पाच उपसा सिंचन योजना मंजूर करून त्याच्या निविदा काढण्यात येऊन कामाचे आदेश देण्यात आले होते. आचारसंहिता संपल्यावर लागलीच कामाला सुरुवात झाली आहे.उपसा सिंचन योजना १ ते ५ मध्ये अमळनेर तालुक्यात बोहरा व कलाली येथे प्रत्येकी एक पंप हाऊस उभारण्यात येणार आहे. तर चोपडा तालुक्यातील धुपे विचखेडा शिवारात एक पंप हाऊस उभारण्यात येणार आहे. तर खेडी व गांधली येथे पंप उभारण्यात येईल. ३ ते ५ फूट व्यासाच्या पायीपलाईनमधून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचवले जाणार आहे. ३ ते ५ हेक्टर क्षेत्रासाठी चक म्हणजे आउटलेट ठेवण्यात येणार आहे.
या पाच उपसा सिंचन योजनांमधून अमळनेर ,चोपडा , पारोळा धरणगाव तालुक्यातील २५ हजार ६५७ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. त्यापैकी २५०० हेक्टर चोपडा तालुक्याचे क्षेत्र तर उर्वरीत अमळनेर ,धरणगाव ,पारोळा तालुक्याचे क्षेत्र आहे. योजना पूर्ण झाल्यावर पाणी वापर संस्था स्थापन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाणी वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान नदी पात्रातील धरणाचे प्रस्तंभांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. नदीला पाणी असल्याने काम सुरू करता येत नाही आणि पाणीही सोडता येत नाही. जानेवारीपासून नदीपात्रातील कामाला सुरुवात होईल. प्रस्तंभ उंची आणि गेट लावण्याचे काम सुरू होईल. साधारणतः या कामाला दोन वर्षे लागू शकतात.
धरण आणि उपसा सिंचन योजनांसाठी कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी , विभागीय अभियंता डी सी पाटील , व्ही एस ठाकूर , जे पी याज्ञीक ,एच पी भटूरकर परिश्रम घेत आहेत.

