दिव्यांग मुलांसोबत केला 80 वा वाढदिवस साजरा —
सेवानिवृत्त अशोक शिंपी यांचे दातृत्व
मनीष जाधव
पारोळा – प्रतिनिधी
वय झाले म्हणून वाढदिवस करायचा नाही,पण एव्हढे दिवस आनंदाने जगलो तर नक्कीच वाढदिवस साजरा करायचा असा विचार मनात आणून स्वतःच्या वाढदिवशी आपल्यापेक्षा कुणाला तरी जास्त आनंद मिळावा असा हेतू मनात धरून दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहता यावे यासाठी रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त टपाल सेवेतील कर्मचारी श्री. अशोक शिंपी यांनी पारोळा येथील चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळेत दिव्यांग मुलांबरोबर वाढदिवस साजरा केला.सेवानिवृत्त अशोक शिंपी यांनी त्यांचा 80 वा वाढदिवस या दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.यासाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत म्हणून देत सर्व मुलांना चॉकलेट व बिस्कीट वाटप केले.
त्याच दिवशी जागतिक दिव्यांग दिन असल्याने उत्साहात साजराही करण्यात आला. दिव्यांगांसाठी काम करणा-या व सर्व दिव्यांगांच्या आयुष्यात प्रकाश टाकणा-या हेलन केलर व लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त टपाल सेवेतील कर्मचारी श्री. अशोक शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ योगेश रघुनाथ महाजन, शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनिष जाधव ,श्री हेमंत महाजन,यांची उपास्थिती होती .जागतिक दिव्यांग दिनाची माहिती मुख्याध्यापक मनिष जाधव व हेमंत महाजन यांनी दिली.
मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध क्रिडास्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांचे उद्घाटन श्री.अशोक शिंपी यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यात,50मीटर धावणे , 100 मीटर धावणे , साॅप्टबाॅल थ्रो , स्पाॅटजंप , लांब उडी अशा स्पर्धा घेण्यात आल्या. सुत्रसंचलन जगदीश सोनवणे सर यांनी तर आभार हेमंत महाजन यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

