कारच्या धडकेत बालिका ठार
बहीण जखमी
अमळनेर:- लोण ता. अमळनेर फाट्यावर बसची वाट पाहणाऱ्या दोन मुलींना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकिने धडक दिल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ता.१७ रोजी दुपारी घडली आहे.
ता.१७ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान लोण बु. येथे मामाकडे आलेल्या तमन्ना सिद्धार्थ भालेराव(वय ११) व अर्चना सिद्धार्थ भालेराव (वय ७) ह्या आपल्या गावी चावलखेडा ता. धरणगाव येथे जाण्यासाठी आपल्या आई, बहीण व मामासह लोण फाट्यावर बसची वाट पाहत असताना अमळनेरकडून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीने (क्र. एमएच १९ बीयु ३५५३) अर्चना व तमन्ना या दोघांना धडक दिली. व गाडी कापसाच्या शेतात बांधावरून पलटी झाली. त्यावेळी अर्चना व तमन्ना यांना उचलले असता तमन्ना हिच्या डोक्याला, पायाला व शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या व ती काहीच बोलत नव्हती, तसेच अर्चना हीचा पाय मोडला होता. त्यावेळी सदर चारचाकीतील चालकास ही मार लागल्याने तो त्याठिकाणी आला. दोन्ही मुली आणि त्या चालकाला अमळनेरकडे जाणाऱ्या वाहनात टाकून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी तपासून तमन्ना हिला डॉक्टरांनी मयत घोषित केले. अर्चना हिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहे. त्यादरम्यान गाडी हा चालक पळून गेला. या अपघात प्रकरणी लोण बु. येथील अनिल खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास हे.कॉ. भरत ईशी हे करीत आहेत.
