डॉ. अनिल शिंदे, के. डी. पाटील, संदीप घोरपडे कोण असेल उमेदवार ?
महाविकास आघाडीचे गणित अजूनही कळेना : मतदारांना उत्सुकता
अमळनेर :-अमळनेर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा आज ता. 24 रोजी नामांकन अर्ज भरला गेला असला तरीही महाविकास आघाडी यांचा उमेदवार घोषित होत नसल्याने त्यांचे या मतदार संघाबाबत काय गणित आहे. तेच कळेना असा प्रश्न निर्माण झाला असल्याने सर्वत्र चर्चेला उत आला आहे.महाविकास आघाडीचा उमेदवाराबाबत अजूनही चाचपणी सुरु असल्याने अमळनेर येथील विधान सभेची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटणार असल्याने त्या गटातील उमेदवार गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून होते. तर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटलांच्या गाडीला कुठे ब्रेक लागले हेच शेवटपर्यंत समजले नसल्याने साहेबराव पाटीलांची भूमिका स्पष्ट न झाल्याने गेल्या चार दिवसांपासून काँग्रेस पक्षाचे डॉ. अनिल शिंदे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र आज ता. 24 रोजी दुपारपासून पुन्हा अमळनेर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सुटत असल्याची चर्चा सर्वत्र असल्याने नेमके महाविकास आघाडी काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. असे असले तर अमळनेर मधून काँग्रेसची जागा नेमकी कुणाला सुटणार? काँग्रेस पक्षाकडून डॉ. अनिल शिंदे, के. डी. पाटील, संदीप घोरपडे यांनी उमेदवारीसाठी मागील पाच ते सहा महिन्यांपासून मतदार संघात संपर्क सुरु आहे. डॉ. अनिल शिंदे यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात भेटी घेत संपर्क कायम ठेवला आहे. तर के. डी. पाटील, संदीप घोरपडे यांनीही काँग्रेस पक्षात बैठका घेत कार्यकर्त्याना कामाला लावले आहे. मात्र महाविकास आघाडी कडून कुठलाच ठोस निर्णय अमळनेर विधान सभा मतदार संघात जाहीर होत नसल्याने तालुक्यात नागरिकांच्या चर्चेला उत आला आहे.
मतदारांना उत्सुकता:-
राज्यात विधान सभा निवडणूकीचे चांगलेच वातावरण तापले असताना अमळनेर विधान सभा मतदार संघाकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे. मंत्री अनिल पाटीलांना या निवडणूकीत शह देणे सोपे नसल्याने महाविकास आघाडी नेमके कोणते डावपेच खेळणार याकडे लक्ष लागून असल्याने मतदारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

