
अमळनेर –अमळनेर विधानसभेचे आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील यांची उमेदवारी महायुतीकडून जाहीर होऊन उद्या ता. 24 रोजी ते नामाकंन दाखल करणार आहेत. मात्र अजूनही महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने त्यांच्या पुढे सक्षम उमेदवार देण्यासाठी आव्हान उभे राहिले असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. गेल्या चार महिन्यांपासून महाविकास आघाडीचे पदाधिकारी विधानसभा मतदार संघात मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र सर्व पदाधिकारीच उमेदवार झाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजूनही कुणालाच उमेदवारी जाहीर न केल्यामुळे भूमिपुत्र अनिल पाटील यांना आव्हान देणारा उमेवाराचा शोध अजूनही शेवटच्या क्षणाला सुरु असल्याचे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी प्रचाराला अगदी कमी दिवस मिळणार असल्याने महाविकास आघाडी आपला उमेदवार केव्हा जाहीर करील आणि प्रचार केव्हा करतील. गेल्या आठ दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी कृषिभूषण साहेबराव पाटील, श्याम पाटील, तिलोत्तमा पाटील नंतर काँग्रेस पक्षाचे डॉ अनिल शिंदे यांनीही शरद पवार यांची भेट घेत उमेदवारी मागितली आहे. मात्र अजूनही उमेदवार कोण? अशीच परिस्थिती असल्याने महाविकास आघाडी नेमके काय साधण्याचा प्रयत्न करीत याकडे लक्ष लागून आहे.
