अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम पाण्यात
पावसाने शेती पिकांचे नुकसान
शेतकऱ्यांनाआर्थिक फटका,शासनाचे दुर्लक्ष–
अमळनेर—
मारवड सह तालुक्यातील आठही मंडळात यावर्षी गेल्या चार महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्यस्थीतीत मका, सोयाबीन, ज्वारी कापणी तर कापूस वेचणीचे कामे जोरात सुरु असताना ऑकटोबर महिन्यातील परतीच्या मान्सूनने धुमाकूळ घातल्याने संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे.तर ता. 18 रोजी रात्री झालेल्या पावसाने
तालुक्यातील आठही मंडळात जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले यात अनेक शेतांचे बांध व जलसंधारणची कामे फुटून शेती सह शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतात पाण्याने तुडुंब भरल्याने पिके पाण्याखाली आली आहेत. गेल्या आठवढा भरापासून कमी अधिक पावसाने मका, ज्वारी, सोयाबीन, कापूस पिकांना जास्त पावसामुळे कोंब फुटले आहेत.रात्री या पावसाने संपूर्ण शेती ही पाण्याखाली आली असुन कपाशी, मका,ज्वारी, सोयाबीनसह आदी पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.ग्रामस्थानी नुकसान भरपाईची मागणी करीत, शेतीच्या पंचनामा करावा अशी मागणी शेतकरी बांधवानी केली आहे. मात्र नुकसान शेती पिकांचे नुकसान होऊनही शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.मका, ज्वारी, सोयाबीन पीक कापणीवर आले आहे तर कापूस पीक वेचणी सुरु असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच जास्त पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.आता आलेले जेमतेम उत्पन्नही हातातून गेल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. याच ऑकटोबर महिन्यात ता. 5 व 6 रोजी नंतर दसऱ्याला ता. 10 व 11 रोजीही पाऊस झाला होता. तर काल ता. 18 ता. 19 रोजी रोजी रात्री झालेल्या पावसाने पिकांना कोंब फुटले असून परिस्थिती हाताबाहेर गेली असूनही जबाबदार अधिकारी पंचनामा करण्याचे आदेश देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.पिकविमा प्रतिनिधी असून नावाला, नुकसान होऊनही ऑनलाईन तक्रार करून कुणी पाहायला तयार नाहीत. काही सर्वसामान्य शेतकरी बांधवाना ऑनलाईन पिकपेरा लावता येत नाही तर ऑनलाईन तक्रार कशी करतील हा प्रश्न पडत असला तरी आजचे डिजिटल प्रशासनाचा फटका सर्व सामान्य शेतकऱ्यांनाच बसतोय.
मका, सोयाबीन, ज्वारी हे पिके उध्वस्त झाली आहेत तर कापूस पिकाची या ऑकटोबर महिन्यातील वेचणी पूर्णता पावसाने मालाची प्रत (दर्जा )खालावला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल घरात साठवता येणार ही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
