
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना अमळनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे.
लोकसेवक श्री. रविंद्र देविदास पवार (वय ४८), ग्रामपंचायत अधिकारी, नगाव बु. ता. अमळनेर, जि. जळगाव यांनी कामाच्या बिलाच्या मंजुरीसाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या चुलत भावाला १५ व्या वित्त आयोगांतर्गत सि.सी. गटार बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविण्याची सुमारे १२ लाख रुपयांची दोन कामे मिळाली होती. या कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपीने एकूण रकमेच्या ७ टक्केप्रमाणे सुरुवातीला ८४ हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने ३० एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून पंचांसमक्ष पडताळणी केली असता आरोपीने यापूर्वी १३ हजार रुपये ऑनलाइन (फोनपे) द्वारे स्वीकारल्याची कबुली दिली. पुढे तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारताना आरोपीला अमळनेर शहरातील केलेनगर येथील त्याच्या राहत्या घरी रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अमळनेर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी पर्यवेक्षण केले असून, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच पथकात अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तत्काळ तक्रार करावी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सहकार्य करावे.
