

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवार, दि. 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळ मासिक जनजागर सोहळ्याची अतिशय भक्तीमय आणि चैतन्यमय वातावरणात विधिवतरीत्या सांगता झाली. या जनजागर अभियानाचा शुभारंभ अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचे औचित्य साधत गेल्या 19 मार्च 2026 रोजी विविध मंत्रिमहोदयांसह शेतकऱ्यांच्या साक्षीने करण्यात आलेला आहे.
आजच्या सांगता सोहळ्याप्रसंगी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, कृषिभूषण सौ. राजश्री राजेश पाटील (हिंगोणा, ता. अमळनेर, जि. जळगाव), पोलीसपाटील विश्वास महाजन, माजी उपसरपंच पुंजू पाटील (शिरूड, ता. अमळनेर, जि. जळगाव), महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे योगेश वंजारी, दिनेश पाटील, दीपक चौधरी, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त डी. ए. सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, मंगल सेवेकरी अनिल कदम, आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी यांच्यासह अमळनेरसह परिसरातील विविध खेड्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला विविध गावांतील शेतकऱ्यांनी आणलेली एक मूठ माती भांड्यात एकत्रित करण्यात आली. त्यानंतर जागेचे मंडल तयार करून संबंधित जागा मंत्रोपचाराच्या माध्यमातून शुद्ध करण्यात आली. मंडलाच्या जागेत सर्व माती एकत्रित करून विविध महानुभाव व शेतकऱ्यांच्या साक्षीने आचमन, प्राणायाम, गणपती बाप्पांचे स्मरण, प्रधान संकल्प करून गणपती बाप्पांचे विधिवत पूजन करण्यात येऊन भूमी अभिमंत्रण विधी करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्वांना भूमी अभिमंत्रित केलेली माती पाकिटात टाकून ते सर्व शेतकऱ्यांसह उपस्थितांना आपापल्या शेतांत टाकण्यासाठी देण्यात आल्यानंतर या मासिक जनजागराची सांगता झाली. याचवेळी शेतकऱ्यांना शेतजमिनीचा पोत सुधारण्यासह ती सुजलाम्-सुफलाम् करण्यासंदर्भात माहिती देऊन हा संदेश आपापल्या गावांत पोहोचवून इतर शेतकऱ्यांनाही भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीचे महत्त्व समजावण्याचे आवाहन अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले.
श्री मंगळग्रह मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी भूमिपूजन सोहळ्याचे पौरोहित्य केले. त्यांना सेवेकरी उमेश पाठक, अमोल र. पाटील, पदमसिंग पाटील यांनी सहकार्य केले.
