
अमळनेर | शहर व परिसरात सध्या रेती वाहतुकीचे डंपर अक्षरशः बेधडकपणे धावत असल्याचे चित्र* समोर येत आहे. अनेक डंपरमध्ये *नियमापेक्षा जास्त रेती भरून (ओव्हरलोड)* वाहतूक केली जात असल्याने शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत *शिवसेनेने प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी* केली आहे. यासंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अमळनेरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देत *ओव्हरलोड डंपरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी* केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
शहरातील अनेक रस्त्यांवरून *दिवस-रात्र ओव्हरलोड रेतीचे डंपर धावत आहेत*, आणि शासनाच्या वाहतूक नियमांचे उघडपणे उल्लंघन होत आहे. या प्रकारामुळे *अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण* निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, या ओव्हरलोड वाहनांमुळे *शहरातील रस्त्यांची झपाट्याने झीज होत आहे*. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असताना संबंधितांवर कारवाई होत नसल्याबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
शिवसेनेने प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, *लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.*
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, तालुकाप्रमुख गुलाबराव पाटील, नगरसेवक साहेबराव पवार, गटनेते पंकज चौधरी, शहरप्रमुख भरत पवार, विलास कंखरे, नगरसेवक नाविद शेख, युवासेना शहरप्रमुख प्रवीण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांकडूनही प्रशासनाने *बेकायदेशीर आणि ओव्हरलोड रेती वाहतूक तातडीने बंद करावी*, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
