
अमळनेर : शेतकऱ्यांचा गहू खरेदी करताना मापात पाप करणाऱ्या तालुक्यातील मंगरूळ येथील आर के फूड्स कंपनीला कृषी उत्पन्न बाजार समितीने सील लावले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी काही वेळ मंगरूळ येथे धुळे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलनही केले
तालुक्यातील सोनखेडी येथील दीपक देविदास पाटील यांनी आपला गहू मंगरूळ एम आय डी सी मध्ये आर के फूड्स मध्ये विक्रीला आणला असता त्याचा माल ५० ते ५५ क्विंटल भरणे अपेक्षित असताना कंपनीत वजन केले असता ४१ क्विंटल भरला. तर गंगापूरी येथील रवींद्र विठ्ठल पाटील यांचाही गहू प्रत्यक्ष वजनापेक्षा कमी भरला. वजनाची तफावत शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी धुळे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. बराच वेळ वाहतूक खोळम्बल्यानंतर बाजार समिती सभापती अशोक पाटील , संचालक शरद पाटील , वृषभ पारख , प्रकाश वाणी , योगेश वाणी , सचिव डॉ उन्मेष राठोड ,संदीप पाटील , सुनील पाटील , योगेश महाजन , डिगंबर पाटील , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील , सागर साळुंखे , प्रशांत पाटील ,सिद्धांत शिसोदे , पोलीस पाटील भागवत पाटील घटनस्थळी पोहचले. वाहतूक सुरळीत केल्यानंतर सर्वांसमक्ष बाजार समिती सभापती व कर्मचाऱ्यांनी आर के फूड च्या कंपनीच्या काट्यावर वजन मोजले असता २०० क्विंटल वजन फक्त ९० क्विंटल भरले आणि १०० क्विंटल चे ४० क्विंटल भरले. मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने उपस्थितांनी प्रचंड संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याने ही बाब तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे वजन माप निरीक्षकानी १३ जानेवारीला वजन काटा पास केला होता.
बाजार समितीने वजन काटा आणि आर के फूड्स कंपनी सील केली आहे.
याबाबत बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी हे प्रकरण वांधा कमिटी समोर ठेवण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आता पर्यंत किती लोकांची फसवणूक झाली याचीही चौकशी केली जाईल. कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले.
