
अमळनेर : दहावीची बोर्डाची परीक्षेस शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. पहिलाच पेपर मराठीचा होता. मात्र, आपल्या मुला-मुलीने जास्त गुण मिळवून उत्तीर्ण व्हावे, यासाठी शहरासह ग्रामीण भागातील काही पालक व नातेवाईक परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविताना दिसून आले. त्यामुळे अनेक परीक्षा केंद्रांच्या आवारात जत्रेचे स्वरूप आले होते. पेपर पोराचा अन् कसरत बापाची अशी स्थिती होती.
परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, तरीही अनेक जण जीवाची पर्वा न करता शाळेच्या पाठीमागून गल्लीबोळातून झाडांवरून, भिंतींवरून परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्याच्या टेरेसवर जाऊन खिडकीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर भिंती चढून खिडक्यांपर्यंत पोहोचण्याची धडपड झाल्याचे दिसून आले. तरीही धावपळ करून कॉपी देण्यात अनेकांना अपयश आले. खिडकी बाहेरून अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना इशारे केले व कॉप्या दाखवला. मात्र, सीसीटीव्ही कॅमेराच्या भीतीने मुले प्रतिसाद देण्यास घाबरत होती. वर्षभर पाल्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून परीक्षेच्या वेळी अशी धडपड होत असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. शिक्षण विभाग आणि प्रशासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष नियोजन केले होते. वर्गात सीसीटीव्ही नजरा, बैठे पथक, भरारी पथक यांची नेमणूक करण्यात आली होती. केंद्रांवर चित्रीकरणाची व्यवस्था होती.
केंद्रांवर नजर फिरवली असता बाहेरून कॉपी पुरविणाऱ्यांनी काही केंद्रांवर प्रशासनाला चांगलेच जेरीस आणल्याचे निदर्शनास आले. अनेक परीक्षा केंद्रे रहिवासी वस्तीत असल्याने बाहेरील गर्दीवर नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे. केंद्राबाहेर पोलिस तैनात असल्याने काही प्रमाणात आळा बसला असला, तरी ग्रामीण भागातील काही ठिकाणी तुरळक प्रकार घडल्याची चर्चा होती. दरम्यान, अमळनेर तालुक्यात कॉपी करताना एकाही विद्यार्थ्यावर कारवाई झालेली नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. कॉपीमुक्त, पारदर्शक वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी पालकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.
