
अमळनेर : शहरातील पद्मजा अपार्टमेंट परिसरात राहणारे कैलास भिमराव ढोकळे (वय ४१) हे मंगळवार दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास ढोकळे हे सोने शुद्ध करण्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या सुमारे २३ दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांनी एका कारचालकास धुळे येथे दवाखान्यात जाण्यासाठी फोन करून १०.३० वाजेपर्यंत घरी येण्यास सांगितले होते.
यानंतर सकाळी सुमारे १० वाजता “
स्वामी समर्थ केंद्रात दर्शन करून येतो” असे पत्नीला सांगून ते घराबाहेर पडले. दुपारी २ वाजेपर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यांचा मोबाईल फोन घरीच आढळून आल्याने शंका अधिक बळावली. अमळनेर शहर, परिसर तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन :कैलास भिमराव ढोकळे, वय ४१ वर्षे, बांधा मजबूत, रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट, केस काळे-पांढरे. अंगात पांढरा शर्ट, ग्रे रेघांची काळी पॅन्ट व पांढरट-राखाडी चप्पल असा पेहराव होता. ते मराठी भाषा बोलतात.
पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मिसिंग रजिस्टरमध्ये नोंद केली असून वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. जळगाव नियंत्रण कक्षालाही अहवाल पाठविण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. प्रमोद पाटील करीत आहेत.
सदर व्यक्तीबाबत कोणास माहिती मिळाल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
