
अमळनेर तालुक्यातील गडखांब येथे गांजा लागवड केल्याप्रकरणी एका शेतकऱ्यावर प्रशासनाने केलेल्या तत्पर कारवाईचे स्वागत करत असतानाच, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल लुटीकडे मात्र प्रशासन डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप गडखांब येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी रमेश व्यंकट पाटील यांनी केला आहे.
दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजता अमळनेरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह गडखांब येथील सुरेश लोटन पाटील यांच्या शेतावर छापा टाकत सुमारे एक बिघा क्षेत्रातील अंदाजे पाच कोटी रुपयांचा गांजा जप्त केला होता. यावेळी संबंधित शेतकऱ्याला अटक करण्यात आली. या कारवाईबाबत प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक करत रमेश पाटील यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
मात्र, याच प्रशासनाने अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या शेतमालाच्या दरवाढीच्या व लुटीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाने जाहीर केलेल्या नियमांनुसार १२ टक्के आर्द्रता असलेल्या मक्याला प्रतिक्विंटल २४०० रुपये दर देणे बंधनकारक असताना, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत हा मका सर्रास १४०० ते १६०० रुपयांत खरेदी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सुमारे ८०० ते ९०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असून, दररोज सुमारे ६ हजार क्विंटल आवक लक्षात घेता शेतकऱ्यांची दररोज सुमारे ५० लाख रुपयांची लूट होत असल्याचा दावा रमेश पाटील यांनी केला आहे.
अतिवृष्टी, वादळ यांसारख्या नैसर्गिक संकटांना तोंड देत कष्टाने पिकवलेल्या मक्याला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून, हीच परिस्थिती पुढे आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
“गांजा लागवडीवर नियमांनुसार कारवाई करणे योग्यच आहे, मात्र शेतकऱ्यांच्या शेतमाल लुटीकडे दुर्लक्ष करून केवळ कारवाईचा आव आणणे सामाजिक व नैतिकदृष्ट्या योग्य आहे का?” असा थेट सवाल रमेश पाटील यांनी प्रशासनाला केला आहे.
शासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी शेतमालाच्या दरातील अनियमितता, बाजार समित्यांतील लूट व शोषण थांबवून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी या प्रेस नोटद्वारे केली आहे.रमेश व्यंकट पाटील
रा. गडखांब, ता. अमळनेर
कार्यकारी सदस्य – गावरानी जागल्या सेना
