
चिमणपुरी पिंपळे :
राष्ट्रीय सेवा योजना, प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 24 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडले. या सात दिवसीय शिबिराचा समारोप चिमणपुरी पिंपळे येथील श्री दत्त मंदिर सभागृहात दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता उत्साहात पार पडला.
समारोप कार्यक्रमासाठी खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस प्रा. पराग पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालय अमळनेरचे प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव होते. यावेळी प्रा. डॉ. संदीप नेरकर (सिनेट सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), माननीय निंबा दला चौधरी (अध्यक्ष, दत्त मंदिर प्रतिष्ठान), ग्रामपंचायत सदस्य श्री युवराज पाटील, श्री संतोष चौधरी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष श्रमसंस्कार शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान, मतदान जनजागृती, आरोग्य जनजागृती, वृक्षारोपणासाठी खड्डे खोदणे व वृक्षलागवड असे विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील एम. राजपूत (सहाय्यक कार्यक्रमाधिकारी) यांनी केले. शिबिराचा अहवाल वाचन कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. हेमंत पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. वैशाली राठोड यांनी केले.
या शिबिरात एकूण 130 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे युवकांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सेवाभाव व सामाजिक जाणीव अधिक दृढ झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
