
अमळनेर : अमळनेर परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर अमळनेर पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईत एक सराईत दुचाकी चोरट्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ३० हजार रुपये आहे.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व डंप डेटा यांच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अरबाज शेख साजीद मनियार (वय २८, रा. धुळे) असे असून, त्याने अमळनेर तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्यासोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
आरोपीने चोरी केलेल्या दुचाकी धुळे शहरात लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धुळे येथे जाऊन
हिरो स्प्लेंडर प्लस (MH19 EJ 5439),
सुझुकी अॅक्सेस 125 (MH18 BY 6692)
सुझुकी अॅक्सेस 125 (MH39 AN 8269)
अशा तीन दुचाकी जप्त केल्या.
या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील व मिलिंद सोनार करीत आहेत.
