यात्राविशेष लेख
पातोंडासह पंचक्रोशीत वरदान असलेली ग्रामदैवत लघुमाहिजी माय ; आज यात्रोत्सव
अमळनेर:-

अमळनेर तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असलेल्या पातोंडा गावाची व पंचक्रोशीतील मठगव्हाण,रुंधाटी, गंगापूरी,मुंगसे,खापरखेडा, सावखेडा, दापोरी,नांद्री,खेडी, खवशी,दहिवद व इतर पंचक्रोशीतील ग्रामदैवत म्हणून श्री माहिजी देवीला मानले जाते. श्री माहिजी देवीचे मंदिर हे पातोंडा मठगव्हाण रस्त्यावर गावाच्या वेशीवर वसलेले आहे. दरवर्षी नवीन वर्षाच्या प्रारंभी महिन्याला पौष शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी देवीची यात्रा भरत असते. काल रोजी देवीचा पालखी सोहळा टाळ मृदंगांच्या गजरात संपूर्ण गावात भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रोत्सवाला आज पासून (ता. ६ जानेवारी) सुरवात होत असून आठवडाभर यात्रा मोठ्या उत्साहात भरत असते. परिसरातील हजारो भाविक यात्रेत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेत असतात.नोकरी निमित्ताने बाहेरगावी असलेले भाविक यात्रेनिमित्त गावात दाखल होत असतात.लहान बालके,तरुण-तरुणी,वृद्ध ग्रामस्थ,महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गावापासून उत्तरेस उंच कळस असलेले सुंदर लघुमाहिजी देवीचे भव्य पुरातन मंदिर आहे. मंदिरात अखंड दगडावर कोरीव सिंहावर आरूढ असलेली देवीची भव्य मूर्ती आहे. ही देवी आजही सप्तशृंगी देवीचे प्रतिरूप म्हणून ओळखली जाते. परिसरात नव्हे तर खान्देशात या देवीला फार महत्त्वाचे स्थान आहे.
आख्यायिका अशी फार प्राचीन काळात देवीच्या मंदिराच्या जागेवर एक मोठा वडाचा वृक्ष होता. या वडाच्या वृक्षाखाली उदासी नावाच्या तपस्वी महाराजांची पर्णकुटी होती. सभोवताली झाडाझुडपांसह पडीक शेतजमीन होती. या शेतजमीनीची मशागत करीत असताना एका शेतकन्याला त्रिशूळ आकाराच्या दगडाचे तीन सुरेख असे बाण सापडले. सप्तशृंगी देवीला सात बहिणी होत्या. त्यापैकी सर्वात लहान बहिणीचे नाव माहिजी देवी असे होते. ती सर्वांत लहान असल्याने या देवीला ‘लघुमाहिजी’ असे संबोधले जात असे. या देवीच्या हातात दगडाचा त्रिशूलाच्या आकाराचा बाण होता, या बाणालाच पूर्वी लघुमाहिजी म्हणून ओळखत असे, अशी आख्यायिका पर्णकूटीत वास्तव्यात असलेले उदासी महाराज सांगत असत. तेव्हापासूनच देवीला ‘लघुमाहिजी देवी’ म्हणून ओळखू लागले अशी माहिती गुरव घराण्यातील देवीचे सेवेकरी कृष्णा गालापुरे सांगतात.
देवीचे मंदीर बांधकामासाठी कै भिकारी शेटे यांनी आपल्या स्वमालकीच्या जमीनीतून जमीन दान दिलेली आहे.
अमळनेर मधील दानशूर प्रतापशेठजी यांनी देवीचे त्यावेळी सुंदर कळस असलेले मंदिर बांधून दिले आहे. मंदिराच्या आवारात परशुरामाचे मंदिर आहे. मंगल कार्यालयही आहे. मंदिराच्या बांधकामासाठी (कै.) जगन्नाथ वामनराव ठाकूर यांनी निधी जमा करून बांधकामाला अग्रक्रम दिला होता.श्री माहिजी देवीची पूजा वंश परंपरागत पुजारी दिवंगत रमेश गालापुरे करत होते आणि आज रोजी त्यांची जबाबदारी त्यांचे सुपुत्र श्रीकृष्ण गालापुरे हे सांभाळत आहेत. आजरोजी मंदिराचा कायापालट पालटला असून सुंदर असे मंदिर आजरोजी उभे आहे. मंदिराचा परिसर हा पेव्हर ब्लॉकने व्यापलेला आहे. मंदिराच्या परिसरात झाड झुडुपांनी हिरवट सजलेली दिसून येते. मंदिराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी असलेले आमदार, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्यांनी भर घातली आणि गावांतील सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने व पाठपुराव्याने महाराष्ट्र शासनाने तिर्थक्षेत्र माहिजी देवस्थानाला “ब वर्ग” प्राप्त करून दिला आहे. यात्रेची
गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेत विविध खाद्य पदार्थांच्या दुकानासह संसारोपयोगी वस्तूची दुकाने थाटलेली असतात. यात्रेत मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते.
पौष शु, चतुर्दशीला मानलेला नवस फेडण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. देवीला नैवेद्य म्हणून वरण व रोडग्याचा प्रसाद अर्पण केला जातो तर पौर्णिमेच्या दिवशी भाविकांच्या योगदानातून गुळाचा शिरा महाप्रसादाचे आयोजन केले जाते. रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्याचे कार्यक्रम होतात. देवीचा मान म्हणून प्रत्येक गल्लीतून दरवर्षी तगतरावांची मिरवणूक काढली जाते.
फोटो – 2
