राज्यमार्ग क्र.३९ वर उड्डाण पुलाचे काम करा -माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे निवेदनातून मागणी
अमळनेर :-
धुळे – पारोळा – एरंडोल जळगाव महामार्गावर राज्यमार्ग क्र.३९ कि.मी. २१/४०० या जंक्शनवर (क्रॉसींग) उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याबाबत निवेदन माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी महाव्यवस्थापक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना दिले आहे. सुरत, धुळे, पारोळा, एरंडोल – जळगाव – हा राष्ट्रीय महामार्ग जळगाव जिल्ह्यातून पारोळा व एरंडोल तालुक्यात जातो. धरणगाव राजवड पारोळा राज्यमार्ग क्र.३९ रस्ता कि.मी. २१/४०० हा रस्ता वरील महामार्गास पारोळा येथे छेदून जातो.या क्रॉसींगवर राष्ट्रीय महामार्गावर वारंवार लहान मोठे अपघात होत आहेत. सदर ठिकाणी असलेली क्रॉसींग एकाच भू-पातळीवर असल्याने ग्रामीण भागातील वाहनधारक, विद्यार्थी व नागरीकांना राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा अंदाज येत नसल्याने, नेहमी लहान – मोठे अपघात होत असतात. त्यामुळे मोठी “जिवीतहानी व वित्तहानी” होत आहे. तसेच बरेच अपघातग्रस्त नागरीकांना “अपंगत्व” आले आहे. तरी वरील अपघात स्थळाची सुधारणा होणेसाठी राष्ट्रीय महामार्गावर अथवा राज्यमार्ग क्र.३९ कि.मी. २१/४०० या मार्गावर उड्डाणपूलाचे बांधकाम प्रस्तावित करण्याबाबतची कार्यवाही होणेसाठी अत्यंत आवश्यकता आहे.
धरणगाव राजवड पारोळा हा रस्ता राज्यमार्ग क्र.३९ – या दर्जाचा असून कि.मी. २१/४०० मधील क्रॉसींगवर वाहतूक वर्दळीचा अंदाज घेता, एकाद्या राष्ट्रीय महामार्गास छेदून जातो, त्यामुळे अशा आवश्यक ठिकाणी अपघात विरहीत बांधकामाची योजना प्रस्तावित करणे अत्यंत गरजेचे वाटते. त्याअनुषंगाने, आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.

