रिक्षा व टॅक्सी स्टॉप असून सुध्दा वाहतुकीचा खोळंबा,
अवैध वाहने उभी करून कोंडला रस्त्याचा श्वास,जबाबदारांचा कानाडोळा
अमळनेर :-
अमळनेर शहरात सध्यस्थितीत धुळे -चोपडा रस्त्यावर बस स्टँड परिसरात अवैध वाहतुकीने रस्त्यांचा श्वास कोंडला असून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
खाजगी वाहतूक करणारे रिक्षा व टॅक्सी स्टॉप असताना रस्त्यात वाहने उभी करून प्रवासी बसविले जातात. यामुळे प्रवाशी यांच्यासह विद्यार्थ्यांचा प्रवास धोक्यात आला असल्याचे चित्र असताना वाहतूक यंत्रणा बघ्याची भुमिका घेत आहे. मागील आठवड्यात दुचाकीवर वयस्कर दोन भाऊ आपल्या नातवंडांना खेळणी घेण्यासाठी जात असताना अमळनेर बस स्टॅण्ड जवळ अवजड वाहनांने लांब पर्यंत त्यांना फरफटत नेले होते. यात त्यांचे नातू थोडक्यात बचावले तर दोघे वृद्ध मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. बस स्टॉप समोरील भागवत रस्त्याकडे प्रवासी पायी जाऊ शकत नाही. एव्हढी बेशिस्त वाहने उभी केलेली असतात.शहरात नको तेथे वाहने उभी करून रस्ता असुरक्षित केला जात आहे. मात्र कानाडोळा करीत प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
स्वामी समर्थ गेट जवळ विद्यार्थी असुरक्षित :-
धुळे -चोपडा रस्त्यावर बस स्टॉप जवळील स्वामी समर्थ गेट जवळील चौफुलीवर बेशिस्त वाहने चालवत धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोठ्या प्राथमिक,माध्यमिक शाळा, इंग्लिश मेडीयम शाळा असल्याने यावेळी सकाळी सात वाजता, अकरा ते साडे बारा वाजेपर्यंत व दुपारी साडे चार ते साडे पाच या दरम्यान विद्यार्थी शाळेत येतात व जातात या चौफुलीवर बेशिस्त वाहने चालविल्याने बऱ्याच वेळा अपघात ही होतात. मात्र यावेळेत वाहतूकीला सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक नियंत्रण करणारा कर्मचारी नेमल्यास ही समस्याही सुटणार आहे. बऱ्याच वेळा याठिकाणी गरज असताना कर्मचारी उभा केला जात नसल्याने तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान बस स्टॉप परिसरात अवैध वाहतुकीला बळ दिले जात असल्याचे चित्र बऱ्याच दिवसांपासून आहे. याकडे लक्ष दिले की अजूनही कानाडोळा करीत विद्यार्थी व प्रवाशी यांच्या बाबतीत सुरक्षित निर्णय घेऊन याला लगाम लावला जाईल?

