धार ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहार प्रकरणी सरपंच ,ग्रामसेवकसह पती व मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर : –
धार ता. अमळनेर येथील ग्रामपंचायतीत विविध विकास कामाचा मोबदला देताना ग्रामपंचायत रेकॉर्ड ला धनादेश मक्तेदाराच्या नावे दाखवण्यात आला असून प्रत्यक्ष धनादेश सरपंच पती व मुलगा यांच्या नावे वटल्याने न्यायालयाच्या आदेशाने सरपंच , ग्रामसेवक , सरपंच पती ,मुलगा आणि मक्तेदारांसह सात जणांवर अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धार येथील माधव दंगल पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयाने १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. धार येथील तत्कालीन सरपंच सुरेखा यशवंत पाटील आणि ग्रामसेवक महेश नथु ठाकूर यांनी फर्निचर, शाळा डिजिटल करणे , तार कंपाऊंड बांधणे , पाणी पुरवठा कामे आदी विकास कामे केल्यावर बिल अदा करताना ग्रामपंचायत रेकॉर्ड ला धनादेश वरद कॉम्प्युटर , रवींद्र विनायक पाटील , शेख शा हरूख शेख मोहरोद्दीन यांच्या नावाने दर्शवले आहेत. प्रत्यक्ष धनादेश बँकेतून सरपंच पती यशवंत शंकर पाटील ,मुलगा अक्षय यशवंत पाटील यांच्या नावाने वटले आहेत. तसेच लाईट बिल भरताना १४ व्या वित्त आयोगातून पाणी पुरवठा विभागाकडे वर्ग दाखवला आहे प्रत्यक्ष तो संबंधित विभागाकडे जमा नाही तसेच रक्कम एक लाखापेक्षा अधिक असताना ई निविदा काढली नाही.म्हणून माधव दंगल पाटील यांनी तक्रार केली होती. त्यावर न्यायालयाने नुकतेच १५६(३) प्रमाणे फसवणूक व अपहार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मारवड पोलीस स्टेशनला सात जणांवर अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

