माय माहेरच्या भूमीत नऊशे माहेरवाशिनींचा रंगला सोहळा
मारवड येथील ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुपचा स्तुत्य उपक्रमाने माहेरवाशीन सुखावल्या –
अमळनेर :
वाट लागे माहेरची, पाय चाले भर भर,
येता मायेची आठवण, मन फिरे घर घर…याओवीतून माहेरची ओढ आणि प्रेम,संसारात रममाण स्त्रीची ओढ नेहमी माहेरच्या वाटेवर लागलेली असते. याचा प्रत्यय
मारवड ता. अमळनेर येथील ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप आयोजित वाट माहेरची हा मारवड आणि मारवड च्या भूमीत शिकलेल्या सर्व माहेरवाशीन लेकिंचा ‘माझं माहेर मारवड ‘ हा स्नेहमेळावा ज्ञानदेव .मुक्ताई ग्रुप मारवड यांच्यातर्फे ता.४ नोव्हेंबर रोजी सु.हि. मुंदडे हायस्कुलच्या प्रांगणात अतिशय भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. या कार्यक्रमाला सुमारे २० वर्ष पासुन ते ९२ वर्ष वयाच्या 900 भगिनी उपस्थित होत्या.शेकडोंच्या संख्येतील माहेरवाशिनींच्या अभुतपूर्व प्रतिसादाने हा सोहळा अतिशय रंगतदार ठरला, गावदरवाजा वरील गणेश पुजनाने रॅलीची सुरवात झाली रॅलित माँसाहेब जिजाऊ, झाशीची राणी, . सावित्रीमाई, यांसारख्या कर्तबगार महिलांची वेशभूषा साकारली होती.कन्या शाळेच्या मुलींच्या लेझीम पथकाने नृत्य केले. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या. मासाहेब जिजाऊ व सावित्रीमाई यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. दिवंगत झालेल्या सर्व माहेरवाशिन भगीनींना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमात साने गुरुजी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता बोरसे, सौ.रूपाली पाटील मॅडम यांच्या माहेरच्या कथा मनात घर करून गेल्या. सौ.अश्विनी चौधरी, सौ.वृषाली पाटील यांचे कथ्थक नृत्य,व सौ.योगिता पांडे व वृक्षवल्ली गृप यांच्या रासनृत्याने रंगत आणली. करोडपती फेम श्री.शरद भाऊ धनगर यांच्या अहिराणी भाषेतील मायमाहेरच्या ओव्या, आणि कवितेने उपस्थित महिला भगिनी भावविभोर झाल्या. तर सौ.अपेक्षा पवार व सौ.शुभांगी खंडाळे यांच्या गीतांवर मनमुराद नृत्याचा आनंद सर्व भगीनिंनी लुटला.मारवडच्या माय -माहेरातील भुतकाळाच्या स्मृती, बालपणाच्या, शालेय जीवनाच्या आणि गावच्या आठवणीना कार्यक्रमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला.सर्व वयोगटाच्या अनेक सखींना अनेक वर्षानंतर माहेरात भेटण्याचा दुर्मिळ योग यानिमित्ताने आला. उपस्थित सर्वांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.कार्यक्रमात लकी ड्रॉ च्या विजेत्या भगिनिंना ” ज्ञानदेव मुक्ताई ग्रुप कडून,” माहेरची साडी ” स्नेहभेट म्हणून ‘देण्यात आली. यावेळी माहेरवाशिण भगिनिंनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. यात सहभागी सर्व स्पर्धकांना पारस गोल्ड,व पद्मालय पोहे, अमळनेर यांचेकडून स्नेहभेट, व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन सौ. रेखा मराठे व सौ. वर्षा पाटिल, प्रास्ताविक सौ.नलिनी मुंदडा यांनी तर आभार प्रदर्शन सौ.करुणा पाटिल व रजनी गुरव यांनी केले.कार्यकमाच्या यशस्वितेसाठी ‘ज्ञानदेव- मुक्ताई ‘ ग्रुपचे श्री. गोकुळ पाटिल, श्री सुभाष पाटिल, महेश साळुंखे, प्रदिप चौधरी, विनय साळुंखे, दिपक पाटिल, सचिन साळुंखे,देवेंद्र साळुंखे प्रदिप निकम, उमेश सुर्वे,शरद पाटिल,सुजित साळुंखे, यांनी सहकार्य केले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
जिल्ह्यात माहेरवाशीनींचा पहिलाच उपक्रम :- मारवड येथील ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुपचा स्तुत्य उपक्रम हा जळगांव जिल्ह्यात माहेरवाशीनींचा पहिलाच स्तुत्य उपक्रम झाला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मारवड सह परिसरातील माहेरवाशी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यात नवतरुण ते 92 वर्ष वृद्ध महिलांनी हजेरी लावत या कार्यक्रमात एकमेकांची गळा भेट घेत आनंद अश्रू दिसून आले. या धकाधकीच्या युगात मारवड येथील या ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुपचा स्तुत्य उपक्रमाने शेकडो माहेरवाशीन एकत्र आल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील कानकोपऱ्यात कौतुक होत आहे.

