कार्यकर्त्यांचा फटाका फोडून जल्लोष
अमळनेर –
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात अमळनेरातून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटाका फोडून जल्लोष केला.
अजित पवार गटाने आज ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अनिल भाईदास पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल भाईदास पाटील हे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. यानंतर मात्र ते अजित पवार यांच्यासोबत गेले होते. त्यांना राज्य मंत्रिमंडळात मदत व पुनर्वसन यासारखे अतिशय महत्त्वाचे खाते देखील मिळाले होते. तसेच त्यांच्यावर पक्षाच्या प्रतोद पदाची देखील जबाबदारी टाकण्यात आली होती. या निवडणूकीत त्यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे आधी स्पष्ट झाले होते. आजच्या यादीतून यावर शिक्कामोर्तब झाले आहे.उद्या ता. 24 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या उमेदवारीसाठी नामांकन अर्ज भरणार असून मंगळग्रह पासून शहरातील मुख्य भागातून कार्यकर्त्यांसह हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज भरला जाणार असल्याने यावेळी उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडीत जल्लोष केला. याप्रसंगी तालुका अध्यक्ष भागवत पाटील, शहर अध्यक्ष मुक्तार खाटीक, भाजपा माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, भाजपा शहर अध्यक्ष विजय राजपूत, भूषण पाटील अलिम मुजावर ,विजू आप्पा,विक्रांत पाटील,सुनिल पवार, गुणवंत पाटील, डॉ. रामराम पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

